जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांची खारेपाटण हायस्कूलला सदिच्छा भेट

खारेपाटण येथे भव्य इंडोर गेम हॉल बांधून देण्याची मागणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी नुकतीच शेठ न. म. विद्यालय व ज्युनियर कॉलेज, खारेपाटणला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी शीतल शिंदे, जिल्हा क्रीडा कार्यलय लिपिक सचिन रणदिवे, आनंद सुरेकर आदी प्रमुख अधिकारी वर्ग उपस्थित होते.

जिल्हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने खारेपाटण हायस्कूल काही प्रमाणत खेळांच्या अत्यावश्यक सुविधांसाठी निधी देण्यात आला होता. याची पाहणी करण्याकरिता व शाळेच्या नवीन क्रीडा विषयी प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नीलीमा अडसुळ या खारेपाटण येथे आल्या होत्या. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी त्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे कार्यालयीन सहाय्यक अनिकेत जामसंडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, संचालक विजय देसाई, संचालक व खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, संतोष पाटणकर, नंदकिशोर कोरगावकर, चिन्मय शिंदे, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, संस्थेचे कर्मचारी यशवंत रायबागकर आदी मान्यवर उपस्थितीत होते. भेट देण्याकरीता आलेल्या क्रीडा अधिकारी व त्यांच्या टीम ने संपूर्ण शाळा परिसराची पाहणी केली व शाळा व्यवस्थापन बाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी क्रीडा अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत शालेय विद्यार्थ्यांसाठी इंडोर गेम खेळण्यासाठी भव्य हॉल बांधून देण्याची मागणी संस्थेच्या व हायस्कुलच्या वतीने मुख्याध्यापक संजय सानप यांनी क्रीडा अधिकारी यांचेकडे केली. शाळेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच तसा प्रस्ताव कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी नीलीमा अडसूळ यांनी शाळा प्रशासनाला केल्या.

error: Content is protected !!