आपण केवळ स्वतःपुरते न जगता, आपल्यामुळे इतरांचे जीवन आनंदी व्हावे त्यासाठी प्रयत्न करणे ही खरी सामाजिक जबाबदारी होय – संदीप परब
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट महाविद्यालयात ‘सामाजिक बांधिलकी आणि युवा पिढी’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या जलदगती जीवनशैलीत सामाजिक भान जपण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरंधर नारे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनात समाजातील प्रत्येक घटकाबद्दल आदर व जबाबदारीची भावना बाळगण्याचे आवाहन केले. “जीवन आनंद संस्थेमध्ये, आई-वडील, आजी-आजोबा यांच्याशी सुसंवाद राखणे आणि त्यांची सेवा करणे ही खरी सामाजिक बांधिलकी आहे”, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते संदीप परब यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनासोबत समाजाशी असलेले नाते दृढ करण्याचे आवाहन केले. “आजच्या काळात केवळ स्वतःपुरते न जगता, आपल्यामुळे इतरांचेही जीवन आनंदी व्हावे, यासाठी प्रयत्न करणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे”, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “पोस्टमन जसे पत्र पोहोचवतो तसेच आपले कार्य इतरांपर्यंत पोहोचवून समाजात सकारात्मक बदल घडवावा.”
या कार्यक्रमास प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. विद्या मोदी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. विनोदसिंह पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पाटील यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकवर्ग, कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.












