‘साहस’ परिवाराचा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानस्नेही उपक्रम

५७५ आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

देवगड (प्रतिनिधी) : साहस शैक्षणिक आणि सामाजिक सेवाभावी युवा संगठन (मुंबई, बोरिवली) यांच्यातर्फे, ६ ते ९ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात, गुजरात व पालघर सीमेवरील अतिदुर्गम, आदिवासीबहुल भागात शैक्षणिक साहित्य, खाऊ, खेळणी, कपडे व भांडी वाटप उपक्रम राबविण्यात आला. रावजी कामडी आश्रम शाळा (ओझरखेड) तसेच बोरीपाडा, काथवडपाडा, घरटापाडा, धायटीपाडा, घोडीपाडा, कुत्तरमाळ, चामीनमाळ, बेरवळ, सादडपाणा व हिवाळी येथील जिल्हा परिषद शाळा अशा एकूण ५७५ विद्यार्थ्यांना दप्तरासह शिक्षणोपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या सेवाभावी संस्थेमार्फत कोरोनाचा कालावधी वगळता या अतिदुर्गम आदिवासी भागात सलग नऊ वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या सामाजिक बांधिलकीच्या कार्यात सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. आनंद (राजू) पाटील व साहस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष भूषण परब यांनी विद्यार्थ्यांशी व गावकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. संस्था सचिव उर्मिला परब, सदस्य रामचंद्र धुमक, अरविंद शर्मा, युवराज परब, भानुदास रेगे, मनीषा शिरसाट, तसेच संत श्री सैलानी बाबा गुरुदत्त ट्रस्ट मुंबईचे कार्याध्यक्ष प्रमोद निवंडेकर आणि नव्वदव्या वर्षीही प्रतिवर्षीप्रमाणे हिरीरीने सहभागी होणारे रमाकांत परब यांचा विशेष सहभाग होता. सदर उपक्रमाचे सातत्य आणि बहुपयुक्तता लक्षात घेता, सर्वच शाळांचे शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी आनंद व समाधान व्यक्त करत साहस परिवाराचे आभार मानले.

संपूर्ण उपक्रमात गावकऱ्यांच्या प्रेमळ आपुलकीयुक्त आदरातिथ्याने मनोमन भारावून गेल्याचे सांगत, साहस परिवाराच्या सदरहू उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ह्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवी अश्या विविध शैक्षणिक टप्प्यातील, आदिवासी समाजातील गरजू मुला-मुलींसाठी त्यांच्या वयानुरूप संस्कार, शिक्षण तसेच कौशल्याधारित व रोजगाराभिमुख प्रशिक्षणातून स्वावलंबन अशा उपयुक्त पैलुंवर प्रभावदर्शी कार्य उभे करण्याचा आमचा मानस व प्रामाणिक प्रयत्न असेल, असे साहस परिवाराचे अध्यक्ष भूषण परब यांनी स्वमत व्यक्त केले.

स्थानिक पातळीवर चिंचओहोळ ग्रामपंचायतचे सरपंच प्रल्हाद बोरसे, तसेच संस्थेचे कार्यकर्ते यशोदाताई महाले, रंगूबाई बोथरणे, योगिताताई मौळे, नामदेव टोकरे, गोविंद जांजर, तुषार महाले, नवसू बोथरणे यांच्या योगदानामुळे उपक्रम यशस्वी पार पडला.

error: Content is protected !!