खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे राखी बनविणे कार्यशाळा संपन्न

शालेय विद्यार्थ्यांनी बनवल्या १७५ आकर्षक राख्या

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत नुकतीच राखी बनविणे कार्यशाळा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या कार्यशाळेत सर्व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुमारे १७५ एवढ्या आकर्षक अशा राख्या बनविल्या.

श्रावण महिन्यातील पवित्र अशा रक्षा बंधन या कार्यक्रमाचे औचित्य साधून ही कार्यशाळा घेण्यात आली होती. यामध्ये शाळेच्या शिक्षिका अलका मोरे, शीतल राठोड, आरती जोजन, समीक्षा राऊत, श्रीम. चव्हाण, अबीदा काझी, पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे आदी शिक्षक वर्गाने शालेय विद्यार्थ्यांबरोबर आपणही कार्यशाळेत सहभाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच शालेय विद्यार्थ्यानी बनवीलेल्या आकर्षक अशा वेगवेगळ्या रंगातील राख्या प्रशाळेत प्रदर्शन स्वरूपात मांडून ठेवण्यात आल्या होत्या. तर राखी पौर्णिमा कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात शालेय विद्यार्थीनीनी बनविलेल्या राख्या सर्व विद्यार्थी बंधू याना हातात बांधल्या. शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!