खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेच्या इयत्ता ७ वी वर्गाच्या १९८५-८६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तथा बाल मैत्री ग्रुपच्या वतीने खारेपाटण केंद्र शाळेला साऊंड सिस्टीम संच साहित्य नुकतेच शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांचेकडे भेट स्वरूपात सुपूर्द करण्यात आले.

खारेपाटण केंद्र शाळेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी मंगेश गुरव, महेश कोळसुलकर, मंगेश ब्रम्हदंडे, दिनेश पाटणकर, संजय कांबळे, देवानंद ईसवलकर, अनिरुद्ध लवेकर, रऊफ पटेल, सुजाता कांबळी, शगुफा मुकादम आदी प्रमुख्याने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी सर्व माजी विद्यार्थी दात्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

खारेपाटण पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं. १ ही आपली मातृशाळा असून ज्या शाळेने आम्हाला बालवयातच संस्काराचे धडे देऊन घडवले त्या शाळेप्रती ऋण व्यक्त करणे ही आपली जबाबदारी ओळखून आपल्या शाळेला ही छोटीशी वस्तूरूप भेट देत असल्याचे शाळेचे माजी विद्यार्थी मंगेश गुरव यांनी सांगितले. यावेळी माजी विद्यार्थ्याकडून शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांचा शाळेला उत्तम कामगिरी करत राज्यातील टॉप शाळेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
तर खारेपाटण केंद्र शाळेला अत्यावश्यक असलेली साऊंड सिस्टीम संच सुविधा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला देणगी स्वरूपात दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका अलका मोरे, शीतल राठोड, आरती जोजन, समीक्षा राऊत, श्रीम. चव्हाण, पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, अबिदा काझी, आदी शिक्षक वृंद व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










