वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी एस. टी. बस डेपो व शिराळे येथील धरणाचे कामाकडे वारंवार मागणी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याकडे प्रशासनाचे लक्षवेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी येत्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. वैभववाडी हे तालुक्याचे ठिकाण असून दररोज हजारो प्रवाशी, विद्यार्थी वैभववाडी शहरात येत असतात. वैभववाडी तालुका हा दुर्गम, डोंगर दऱ्याखोऱ्यात वसलेल्या खेड्यांचा तालुका आहे.
दळणवळणासाठी हा तालुका हा एस. टी. बस वरच अवलंबून आहे. मात्र तालुका मुख्यालय असूनही वैभववाडी येथे एस. टी. डेपो नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सद्या असलेल्या बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी सुद्धा पुरेशी जागा नाही. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, शौचालय सारख्या प्राथमिक सुविधा सुद्धा नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे याठिकाणी सर्व सोई सुविधाने परिपूर्ण असे एस. टी. डेपो मंजूर करावा. तसेच मानव विकास योजनेच्या बस या वैभववाडी तालुक्यातच फिरवण्यात याव्यात. गणपती सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेऊन या बस तालुक्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु ठेवा. शाळांना सुट्टी आहे म्हणून त्या बंद करू नये, अशी मागणी सुतार यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे सडूरे शिराळे येथील प्रस्तावित धरणाचे काम सुद्धा मार्गी लावावे, अशा मागण्याचे निवेदन संबंधित विभाग व खासदार नारायण राणे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ 15 ऑगस्ट रोजी उपोषण करत असल्याचा इशारा सुतार यांनी दिला आहे.












