चौके (प्रतिनिधी) : सकस, समतोल तसेच विषमुक्त आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक असून रानभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे व खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे या भाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश होणे गरजेचे आहे. यामुळे आहारातील कमतरता भरून निघण्यास मदत होईल, असे प्रतिपादन कणकवली उपविभागीय कृषि अधिकारी उमाकांत पाटील यांनी केले. ते तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव 2025 च्या उद्घाटनप्रसंगी आनंदव्हाळ येथे बोलत होते. हा महोत्सव महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, महिला आर्थिक विकास महामंडळ (सिंधुकन्या कट्टा) व जय हनुमान मंदिर ट्रस्ट, आनंदव्हाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन उमाकांत पाटील यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
या प्रसंगी तालुका कृषि अधिकारी मा. अमोल करंदीकर, जिल्हा समन्वयक अधिकारी मा. नितीन काळे, मंडळ कृषि अधिकारी आचरा हुसेन आंबर्डेकर, मंडळ कृषि अधिकारी पोईप दशरथ सावंत, सरपंच आनंदव्हाळ रश्मी टेंबूलकर, सरपंच कातवड प्रतीक्षा हळदणकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, सिताराम परब, श्रीपाद चव्हाण, राणी थोरात, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, मालवण निलेश गोसावी, व्यवस्थापक सिंधुकन्या CMRC गीता चौकेकर, पाककला परीक्षक कविता तळेकर, रानभाजी तज्ञ मार्गदर्शक रामचंद्र शृंगारे तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवात रानभाज्यांची ओळख, त्यांचे आहारातील महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात कोकणातील तब्बल 32 रानभाज्यांचे नमुने आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले होते. पाककृती स्पर्धेत 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यातून प्रथम 3 विजेते व 7 उत्तेजनार्थ विजेते घोषित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिक, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :
1️⃣ प्रथम – राजश्री कोदे, चिंदर – शेवगा लाडू
2️⃣ द्वितीय – रिया मराळ, आंबडोस – कुड्याच्या शेंगाचे लोणचे
3️⃣ तृतीय – निता ओटवणेकर, देऊळवाडा-मालवण – मिक्स रानभाजी चीजबॉल
4️⃣ चतुर्थ – तृषा गावडे, चौके – गुळवेल डोसा
5️⃣ पाचवा – रत्ना लब्दे, माळगाव – मिक्स रानभाजी कटलेट
6️⃣ सहावा – पूजा धुरी, कोळंब – निवडुंग वडी
7️⃣ सातवा – मंजुषा मेस्त्री, देवली – चवई फुलाचे कटलेट
8️⃣ आठवा – प्रतीक्षा हळदणकर – खरशिंगाची भाजी
9️⃣ नववा – स्नेहल चव्हाण, देवली – कणककोंबाची भाजी
🔟 दहावा – दिव्या मिसाळ, कुंभारमाठ – टाकळ्याची कोशिंबीर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सेवक स्नेहा खोत यांनी केले तर आभार प्रदर्शन उपकृषी अधिकारी धनंजय गावडे यांनी केले.











