मुंबईत कालच्या तुफानी पावसात ‘जीवन आनंद संस्थेचे’ संवेदनशील व माणुसकीचे कार्य

रस्त्यावरील निराधार व वंचित बांधवांसाठी सदिप परब यांचे अनुकरणीय कार्य

खारेपाटण (प्रतिनिधी) : काल झालेल्या तुफानी पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळित केले होते. तर अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊन पाणी साचलेले होते. अनेक घरात पाणी गेले होते. याबरोबरच विजेच्या अडचणींनी सामान्यांचे हाल झाले होते. मात्र यामध्ये सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला तो रस्त्यांवर राहणाऱ्या निराधार, गरजू बांधवांना – विशेषतः लहान मुलांना, महिलांना आणि वृद्धांना.

या संकटाच्या क्षणी ‘जीवन आनंद’ या संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी मानवतेचा मोठा आदर्श घालून दिला. खाररोड येथील फुटपाथवर त्यांनी स्वतः बस्तान ठोकले व पावसात भिजलेल्या, थंडीने कुडकुडणाऱ्या खाररोड आणि दहिसर स्टेशन पश्चिम येथील बालकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अन्नवाटप करण्यात आले. विशेष म्हणजे परब यांनी स्वतःच्या हाताने बालकांना प्रेमाने जेवण भरवले आणि त्यांच्यासोबतच फुटपाथवरच जेवले आणि झोपले. पावसापासून संरक्षणासाठी जीवन आनंद संस्थेच्या वतीने खाररोड येथील पदपथावरच्या कुटुंबांना प्लास्टिक शिट्स देण्यात आल्या.

यावेळी संस्थेचे कार्यकर्ते प्रसाद आंगणे आणि गोविंद मार्गी यांनी याकामी संदिप यांना मोलाची साथ दिली. संदिप परब यांनी ‘जीवन आनंद’ संस्थेची स्थापना रस्त्यावरील निराधार व्यक्तींना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे या हेतूने केली. प्रारंभी कोणतीही आर्थिक मदत किंवा साधने नसताना, त्यांनी सांताक्रुझच्या वाकोला पुलाखाली आजारी व जखमी लोकांची सेवा केली. त्यांच्या या कार्याला समाजातील संवेदनशील नागरिकांनी पाठिंबा दिला आणि याच पायावर आज मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यात संस्थेची आश्रम व शेल्टर होम्स उभी राहिली आहेत.
“पदपथावरील बांधवांना आणि निराधार बालकांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे,” असे आवाहन परब यांनी केले आहे. तसेच, या मुलांमधून उद्याचे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याचेही त्यांनी जनतेला आवाहन केले. त्यांचे हे कार्य नक्कीच अनेकांना प्रेरणा देणारे असून, सामाजिक बांधिलकीची खरी ओळख करून देणारे आहे.

error: Content is protected !!