कणकवली (प्रतिनिधी) : सालाबाद प्रमाणे या ही वर्षी नरडवे गावातीत पवारवाडी येथे पवारवाडीचा राजा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा व पूजाअर्चा विधीपूर्वक करण्यात आली. पूर्ण पवार बांधवांचा मिळून हा एकच गणपती असतो. गणेशोत्सव काळात होणारा गौरीचा सण देखील सर्वजण एकत्र मिळून साजरा करत असल्याने अगदी खास असतो. दरवर्षी वाडीतील मंडळी जल्लोषात वाजत-गाजत गणेश मूर्ती आणतात. यावेळी देखील गावातील भक्तिमय वातावरणामुळे उत्सवाचे वेध सर्वत्र पसरले होते. ही सार्वजनिक गणेशोस्वाची परंपरा गेली अनेक पिढ्यानं पासून चालत आली आहे. यावेळी येथील मंडळी प्रतिवर्षी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. यामध्ये दहावी-बारावी उत्तीर्ण तसेच विविध पदविका प्राप्त गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे अन्य क्षेत्रात नाव कमावलेल्या व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात येतो. समाजासाठी कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा देखील सन्मान व सत्कार केला जातो. बच्चेकंपनीसाठी त्यांना गणेशोत्सवाची आवड निर्माण व्हावी म्हूणन विविध खेळांचे आयोजन केले जाते. यामध्ये संगीत-खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे, मेणबत्ती पेटविणे, तळ्यात-मळ्यात, पासिंग बॉल, गोंता उडी, चमचा लिंबू इत्यादी खेळांचे आयोजन केले जाते तसेच महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक व अन्य मंडळींसाठी देखील विविध खेळांचे आयोजन केले जाते. विजेत्यांना विशेष बक्षीसही दिले जाते. सोबतच लहान मुलां-मुलींचे डान्स व महिलांचे भजन व फुगडी यांसारखे उपक्रम राबविले जातात. अश्या प्रकारे अनंत चतुर्दशी पर्यंत चालणारा हा गणेशोत्सव थाटामाटात व भक्तिमय वातावरणात प्रतिवर्षी साजरा केला जातो.


नरडवे गावातील साजरा केलेला गणेशोत्सव :- https://youtu.be/6YHRS8Db3hE












