जि. प. केंद्र शाळा घोणसरी नं. १ येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक 30 ऑगस्ट, 2025 रोजी जि. प. केंद्र शाळा घोणसरी नं. १ येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यास घोणसरी गावचे सरपंच प्रसाद राणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन सुतार तसेच राजेंद्र उर्फ भाई राणे, शंकर जाधव, प्रकाश मुतालिक, आप्पा जंगम, मुख्याध्यापक स्वप्नाली बेळणेकर शिक्षिका अस्मिता तावडे, श्रेया नाणचे, संजना शिरसाट व माजी विद्यार्थी, शालेय समितीचे सर्व सदस्य व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

केंद्रशाळा घोणसरी नं. १ मधून शिक्षण घेऊन गेलेले व आज हयात नाहीत अशा माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापिका स्वप्नाली बेळणेकर यांनी शासनाच्या मेळाव्याबाबतचे परिपत्रक वाचन केले व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे सांगितले. त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये विनायक चव्हाण, अनिल चव्हाण, रमेश कृष्णा सावंत, प्रकाश मुतालिक, भाई राणे, संतोष बांबरकर, विलास मराठे, शंकर जाधव, अशोक जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शालेय समिती व्यवस्थापनकडून माजी विद्यार्थ्यांमधून वाडीवर सदस्य नेमणूक करून शाळेच्या शैक्षणिक व भौतिक गरजा पूर्ण करण्यात येतील असे ठरवण्यात आले. या शाळेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे माजी विद्यार्थ्यांनी मान्य केले. यावेळी गावातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामे केलेले माजी विद्यार्थी, शेतकरी ग्रामस्थ हजर होते. मान्यवर व्यक्तींचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या संपूर्ण मेळाव्याचे सूत्रसंचालन राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार विजेते माजी विद्यार्थी आनंद जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली बेळनेकर यांनी केले.

error: Content is protected !!