वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात गगनबावड्यापासून सुमारे २ कि. मी. अंतरावर यु आकाराच्या वळणात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 7 वा. च्या सुमारास घडली. तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवरची वाहतूक ठप्प झाल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक भुईबावडा व फोंडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे. यामुळे गुरुवारी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. दरड हटवण्याचे काम संबंधित यंत्रणेच्यावतीने युद्ध पातळीवर सुरू आहे.मात्र सह्याद्री पाट्यात पडत असलेल्या पावसामुळे दरडी हटविण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. तर याच ठिकाणी आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यत वाहतूक सुरु होण्याचा अंदाज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाकडून देण्यात आला आहे.
तालुक्यात गेले काही दिवस संततधार पडणाऱ्या पावसाचा फटका करुळ घाटाला बसला आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या यु आकाराच्या वळणात दरडीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला आहे. मोठमोठ्या दगडी रस्त्यात आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरड हटविण्यासाठी रस्त्याच्या दोन्हीही बाजूने जेसिबी लावण्यात आले आहेत. मात्र मोठमोठे दगड असल्यामुळे मशीनच्या साहाय्याने दगड फोडून बाजूला करण्यात येत आहेत. मात्र घाटात पडत असलेल्या पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे. तर याठिकाणी आणखी काही दरडीचा भाग कोसळण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही दरड हटवून वाहतूक सुरु होण्यास शुक्रवारी दुपार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
गणपती उत्सवाला आलेले चाकरमानी मुंबई, पुणेच्या परतीच्या प्रवासाला लागले असून घाट बंद असल्यामुळे त्याचा फाटका त्यांना बसला आहे. त्यांना भुईबावडा व फोंडा घाटातुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांची परवड होत आहे.














