सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन कार सह एकूण 10 लाख 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात सावंतवाडी आणि ओरोस मधील चार आरोपीना पकडण्यात आले आहे. नासिर इकबाल राजगुरू, अनंत अरुण मेस्त्री, शांताराम विष्णू कावले (तिघेही रा. सावंतवाडी), ओंकार सावंत (रा. ओरस) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता मुंबई गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची खबर एलसीबी ला मिळाली होती. त्यावरून एस. पी. डॉ. दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार प्रकाश कदम, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर यांचे पथक झाराप झिरो पॉईंट येथे दबा धरून बसले होते. मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास संशयित आय टेन आणि स्विफ्ट कार गोव्याहून कुडाळच्या दिशेने जाणारी पोलिसांना दिसली. एलसीबी च्या पथकाने दोन्ही कार थांबवून पाहणी केली असता कारमध्ये एकूण 2 लाख 92 हजार 800 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. तात्काळ दोन्ही कारसह वरील चारही आरोपीना ताब्यात घेत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.
एलसीबीचा अवैध दारू वाहतूकीला चाप ; दोन कारसह 10 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त










