खारेपाटण ग्रामस्थाचा वीज अभियंता व सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला घेरावा

अनियमित विजपुरवठा व महामार्गाशी संलग्न अपुऱ्या कामाबाबत अधिकारी वर्गाला विचारला जाब

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने गावातील विविध समस्यांच्या संदर्भात खारेपाटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी कनिष्ठ शाखा अभियंता कार्यालय व महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय येथे मोर्चा नेत समस्यांबाबत जाब विचारला. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामकांत राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर, शिवसेना शिंदे कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, नंदकिशोर कोरगावकर, विजय देसाई, मंगेश ब्रम्हदंडे, सुरेश गुरव, विजय सावंत, सुहास राऊत बबन तेली, प्रकाश कांबळी, ग्रा.पं. सदस्य जयदीप देसाई, किरण कर्ले, अस्ताली पवार, दक्षता सुतार, क्षितिजा धुमाळे, आदी मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर कधी अती उच्च दाब वीज पुरवठा येत असल्याने ग्रामस्थांना घघुती विज उपकरणे जाळ्याच्या घटना देखील खारेपाटण मध्ये घडल्या आहेत.तसेच खारेपाटण गावातील विद्युत पोल जुने झाले असून गंजले ते देखील अचानक कोसळून पडल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे येथील कार्यालयात कायमस्वरूपी कनिष्ठ सहायक अभियंता यांची नेमणूक करून येथील समस्यांचा निपटारा करावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थानी केली.दरम्यान वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी श्री खोत तसेच वैभववाडी कार्यालयाचे वीज अधिकारी याना ग्रामस्थानी मागण्याचे लेखी निवेदन देऊन आठ वीज समस्यांची सोडवणूक करण्याकरिता आठ दिवसाची मुदत दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनुपस्थित खारेपाटण ग्रामस्थांचा मोर्चा अखेर खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्याकडे नेण्यात आला.

यावेळी येथील अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे ग्रामस्थांचा पारा अधिक चढला. जर इथे अधिकारीच उपलब्ध नसतील तर आम्ही आमच्या समस्या मांडायच्या कोणाकडे असा सवाल यावेळी ग्रामस्थानी उपस्थित केला. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न अशी बरीच कामे खारेपाटण मध्ये अपूर्ण असून येथील अधिकारी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असून सर्विस रोड अपूर्ण असून महामार्गावर पुरेशी पथदिवे उपलब्ध नाहीत. आहेत ते सुद्धा बंद अवस्थेत आहेत तसेच अत्यावश्यक ठिकाणी स्पीडब्रेकर रंबलर, दिशादर्शक फलक आणि साईड गटारे नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याचे सध्याचे चित्र आहे. तरी याबाबत हायवे प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत अशा मागणीचे लेखी निवेदन यावेळी उपस्थित कर्मचारी वर्गाकडे देण्यात आले.

error: Content is protected !!