सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत व कार्यकर्ते ज्ञानदेव सोमा जाधव उर्फ नाना डामरेकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत व तडफदार नेतृत्व असलेले ज्ञानदेव सोमा जाधव (नाना डामरेकर) यांचे दिनांक २३ सप्टेंबर, २०२५ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी डांबरे बौद्धवाडी येथे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दिवंगत नाना डामरेकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटक होते. रोखठोक स्पष्ट वक्तेपणा, तडफदार नेतृत्व व चळवळीप्रती अखंड निष्ठा ही त्यांची ओळख होती. काही काळ त्यांनी तलाठी म्हणून काम केले. लोकसेवेसाठी बॉण्ड रायटर म्हणूनही काम केले. त्यांनी मोबदला न घेता दलित, आदिवासींचे प्रश्न सोडवले. ऍड. प्रकाश आंबेडकर तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांसोबत त्यांनी पक्षीय काम केले. वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. दलित पँथरचे ते अतिशय सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी आंबेडकरवादी विचारसरणी जनमानसात रुजवण्यासाठी सातत्याने काम केले.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, मोठे भाऊ, पुतणे, पुतणी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे अंतिम संस्कार दिनांक २४ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी दहा वाजता डांबरे येथे होणार आहेत. आज त्यांच्या निधनाने चळवळीचे एक खंबीर नेतृत्व हरपले आहे.

error: Content is protected !!