आचऱ्याची तहान भागविण्यासाठी पारवाडी नदीवर बंधाऱ्याचे नियोजन; नीलेश राणे यांचा पुढाकार!

गोड्या पाण्याचा साठा वाढविण्यासह गाळ उपशालाही मिळणार चालना; आमदारांकडून नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी

आचरा (प्रतिनिधी) : उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि समुद्राला वाहून जाणारे गोडे पाणी अडवून त्याचा उपयोग करण्यासाठी आचरा येथे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकाराने पारवाडी नदीवर बंधारा उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून, सोमवारी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रस्तावित बंधाऱ्यामुळे गोड्या पाण्याचा साठा वाढण्यासह भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच नदीतील गाळ उपशाच्या कामालाही चालना मिळणार असल्याने आचरा परिसरातील जलसंधारणाला बळ मिळण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी आचरा गावचे सरपंच जेरॉन फर्नांडिस आणि ग्रामस्थांनी आमदार नीलेश राणे यांची भेट घेऊन पारवाडी नदीच्या मुखाशी बंधारा उभारण्याची मागणी केली होती. समुद्राचे खारे पाणी नदीपात्रात येण्यास प्रतिबंध करणे, गोड्या पाण्याचा साठा वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करणे, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश होता. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आमदार राणे यांनी सोमवारी दुपारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मालवण गटविकास अधिकारी परागिणी पाटील, तालुकाध्यक्ष विनायक बाईत, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, मंदार लुडबे, सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, राजन गावकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, अनिल करंजे, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, चंदू कदम, पंकज आचरेकर, महेंद्र घाडी, श्रुती सावंत, सारंग, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, बाबू कदम, गुरु कांबळी, ग्रामस्थ अरुण आपकर, श्रीपाद वायंगणकर, मुकेश सावंत आणि अजित घाडी यांच्यासह पारवाडी येथील ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंधाऱ्याचा आराखडा आणि खर्चाचा अंदाज तातडीने सादर करण्याचे निर्देश

प्रस्तावित बंधाऱ्याची जागा निश्चित करणे, त्याची उंची ठरविणे तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या खर्चाचा सविस्तर अंदाज तयार करून तातडीने सादर करण्याच्या सूचना आमदार नीलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यंदा बंधाऱ्याच्या उभारणीसंदर्भातील प्राथमिक चाचपणी आणि अंदाजपत्रकाची प्रक्रिया पूर्ण करून पुढील वर्षी पक्क्या बंधाऱ्याचे बांधकाम हाती घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

गाळ उपशामुळे नदीपात्रालाही मिळणार मोकळा श्वास

पारवाडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीच्या पाणी साठवण क्षमतेवर आणि प्रवाहावर परिणाम होत आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या नियोजनासोबतच नदीतील गाळ उपशाचे कामही प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी नाम फाउंडेशनला कार्यादेश देण्यात आला असून, लवकरच गाळ उपशाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.

प्रस्तावित बंधाऱ्यात अडविण्यात येणाऱ्या गोड्या पाण्याचा आचरा परिसरासह मालवण तालुक्यातील अन्य गावांना उपयोग होऊ शकतो का, याचीही तपासणी करण्याचे निर्देश आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. बंधारा उभारणी आणि गाळ उपशाची कामे मार्गी लागल्यास जलसंधारणाला चालना मिळण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

आमदार नीलेश राणे यांनी घेतले ४१ दिवसांच्या गणरायाचे दर्शन

आचरा दौऱ्यादरम्यान आमदार नीलेश राणे यांनी श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले. तसेच मंदिरातील चौघड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या ४१ दिवसांच्या गणपती बाप्पाचेही दर्शन घेतले. परिसरातील पाणीटंचाईचे संकट दूर होऊन सर्वत्र पाण्याची सुबत्ता नांदावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी देवस्थानचे सचिव संतोष मिराशी यांच्या हस्ते आमदार राणे यांचा सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!