तुळसमध्ये ८० नागरिकांना लाभ; कुंभारटेम्ब मित्र मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुंभारटेम्ब मित्र मंडळ, तुळस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या N.C.M.C कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री शारदा विद्यालय, तुळस येथे पार पडलेल्या या शिबिरात तब्बल ८० नागरिकांनी NCMC कार्ड सुविधेचा लाभ घेतला.
नागरिकांना N.C.M.C कार्ड काढण्यासाठी वेंगुर्ला येथे जावे लागू नये, त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचावा, तसेच स्थानिक पातळीवरच ही सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे महिला, शेतकरी आणि इतर नागरिकांना आपल्या गावातच कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध झाली. नागरिकांची गैरसोय दूर करणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी
वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता नागरिकांच्या उपयोगाचा सामाजिक उपक्रम राबवून कुंभारटेम्ब मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली. स्थानिक नागरिकांना आवश्यक सुविधा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंडळाने घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक नागरिकांना एकाच ठिकाणी N.C.M.C कार्ड काढण्याची संधी मिळाली.
यावेळी उपसरपंच नारायण कुंभार म्हणाले, “विशाल परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या उपयोगाचा उपक्रम राबविता आला, याचा आनंद आहे. नागरिकांना विविध शासकीय व सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी असे सामाजिक उपक्रम यापुढेही राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
या शिबिराच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे कुंभारटेम्ब मित्र मंडळ, तुळस यांच्या वतीने आभार मानण्यात आले.












