अतिवृष्टीचा परिणाम; तिलारी धरण ९८.७६ टक्के भरले

जलसंपदा विभागाने सांडवे उघडण्याचा दिला इशारा

दोडामार्ग (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या धरण ९८.७६ टक्के भरले असून पाण्याची पातळी ११२.८२ मीटरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीचा निर्णय घेत धरणाचे सांडवे येत्या १२ तासांत कधीही उघडण्यात येतील, असा इशारा दिला आहे.

२३ सप्टेंबरला सर्व दरवाजे बंद केल्यानंतर धरणाची पातळी ११२.३६ मीटर इतकी होती. मात्र तालुक्यात व पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा साठा वाढत राहिला. २७ सप्टेंबरला धरण ९७.४३ टक्के भरले होते, तर फक्त दोन दिवसांत ५.८१२ द.ल.घ.मी. पाण्याची भर पडून आज सकाळी ८ वाजता धरण ९८.७६ टक्के क्षमतेपर्यंत पोहोचले. या वेगाने वाढ होत राहिल्यास नियोजित १९ ऑक्टोबरपूर्वीच १०० टक्के भराव गाठण्याची शक्यता आहे.

खळग्यातील दगडी धरणाचे सांडवे उघडून अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी, “जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीकाठच्या ग्रामस्थांनी विशेष काळजी घ्यावी,” असे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!