बिबट्याची नखे आणि दात तस्करी करणारे वनविभागाच्या ताब्यात; फोंडाघाटसह कोल्हापूरमधील चौघे गजाआड

बारा बिबट नखांसह चार दात जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली वनविभागाने मोठी कारवाई करत बिबट्याची १२ नखं व ४ सुळे (दात) विक्रीसाठी घेऊन आलेल्या चौघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज ३० सप्टेंबर रोजी डामरे येथील स्वामी समर्थ मठ परिसरात करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनक्षेत्रपाल कणकवली व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ मोटारसायकलींसह बिबट्याचे नखं व सुळे जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ५१ व ५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट, ता. कणकवली), कृष्णात भिकाजी रेपे (रा. अकनूर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), तौफिक अल्लाउद्दीन सनदी (रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव), परशुराम प्रकाश बोधले (रा. नवलीहळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सावंतवाडी सहा. वनसंरक्षक (खाकुता व वन्यजीव) एस. के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. पाटील, फोंडा वनपाल धुळू कोळेकर, देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट, दिगवळे वनपाल सर्जेराव पाटील, वनरक्षक सुखदेव गळवे, प्रतिराज शिंदे, सिद्धार्थ शिंदे, रामदास घुगे, नितेंद्र पोर्लेकर, रोहित सोनगेकर, अंकुश माने, तसेच स्वाती वनवाडे, रिद्धेश तेली, सागर ठाकूर, चालक व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केली.

या गुन्ह्याबाबत अन्य काही माहिती असल्यास कणकवली वनविभाग यांना कळविण्यात यावी, सदर व्यक्तीचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!