सिंधुदुर्गनगरीत 6 नोव्हेंबर रोजी ‘डाक अदालत’; 4 नोव्हेंबरपर्यंत तक्रारी पाठवण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : टपाल विभागाच्या सेवेबाबत ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने दिनांक 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयात ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती टपाल विभागातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

देशातील टपाल सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा अभिन्न भाग असून ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा विभागाचा प्रयत्न असतो. तरीही सेवा देताना काही त्रुटींमुळे ग्राहकांच्या तक्रारी निर्माण होतात. या तक्रारींचा योग्य न्यायनिवाडा करण्यासाठी या अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. टपाल कामकाजाबाबत ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशाच तक्रारींची दखल या अदालतीत घेतली जाईल. यात प्रामुख्याने टपाल, स्पीड पोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीमध्ये तारीख, यापूर्वी ज्या अधिकाऱ्यास अर्ज पाठविला असेल त्यांचे नाव व हुद्दा यासह सर्व तपशील स्पष्टपणे नमूद केलेला असावा.

संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार एन.टी. कुरळपकर, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी 416812 यांच्या नावे दिनांक 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे आवाहन टपाल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!