देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न’

Y जंक्शनच्या सुशोभीकरणासाठी ८५ लाखांचा निधी !

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

ऐतिहासिक-सांस्कृतिक ओळख जपणारे आकर्षक सर्कल उभारणार

वाहतूक कोंडी फुटणार, पर्यटनासह रोजगारालाही चालना

देवगड (प्रतिनिधी) : देवगड शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच वाहतूक व्यवस्था अधिक सुसज्ज करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या आगाराजवळील ‘Y जंक्शन’च्या सुधारणा व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सिंधुरत्न योजनेतून या कामासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

देवगडच्या ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडविणारे सर्कल

या प्रकल्पांतर्गत Y जंक्शन येथे आकर्षक सर्कल उभारण्यात येणार असून, त्यामध्ये देवगडची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा स्टॅच्यू साकारण्यात येणार आहे. त्यामुळे देवगड शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून, शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना देवगडच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख करून देणारे हे ठिकाण ठरणार आहे. तसेच या कामामुळे संबंधित परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुसज्ज होण्यास मदत होणार आहे.

‘देवगडकरांनी सांगितलेली कामे विसरलो नाही’

भूमिपूजनप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, देवगडच्या विकासासाठी आपण वारंवार येथे येत असून, केवळ येण्यापुरते न थांबता प्रत्येक वेळी एखाद्या विकासकामाचे भूमिपूजन करून जाण्याचा आपला प्रयत्न आहे. देवगडकरांनी गेल्या १२ वर्षांत व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि प्रलंबित प्रश्नांची आपल्याला जाणीव असून, एकेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. आमदार असताना ज्या कामांसाठी पाठपुरावा केला, त्यातील अनेक कामे पालकमंत्री झाल्यानंतर मार्गी लागत आहेत. देवगडकरांनी सांगितलेली कामे आपण विसरलेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Y जंक्शनमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Y जंक्शनच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, पर्यटन हंगामात तसेच ३० आणि ३१ डिसेंबरच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या जंक्शनच्या सुधारणेमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. वाहतूक व्यवस्था सुधारण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल. अशा विकासकामांमुळे शहरातील बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

खंदक गार्डनमधून ५०० जणांना रोजगाराची संधी

देवगडमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून राणे म्हणाले की, खंदक गार्डनच्या सुशोभीकरणामुळे पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. या उद्यानाच्या माध्यमातून किमान ५०० लोकांना रोजगार मिळू शकतो. देवगडमध्ये नाट्यगृह, क्रीडांगण, सांस्कृतिक भवन यांसारखे प्रकल्पही साकारले जात आहेत. तसेच कुणकेश्वर परिसरातील ताज समूहाच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात रोजगार मिळावा, यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्थाही करण्यात येत आहे.

स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, हीच भूमिका

देवगडच्या तरुण-तरुणींनी स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावा, अशी भूमिका घेत एकत्र येऊन आवाज उठवला, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक तरुणांना नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. देवगडच्या विकासासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी नागरिकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

देवगडच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याच्या प्रवृत्तीवर टीका करताना त्यांनी विकासाला विरोध करण्याऐवजी चांगल्या कामांना सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे सांगितले. देवगडच्या मच्छीमारांच्या प्रश्नांवरही आपण लक्ष देत असून, जेटीच्या वादामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पर्यायी स्वतंत्र जेटी उभारण्याकरिता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे पाठपुरावा केला आहे. यासाठी सुमारे ५० ते ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विविध प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना राणे यांनी रत्नागिरी परिसरात गोवा शिपयार्डच्या विस्तार प्रकल्पाचा उल्लेख केला. या प्रकल्पाचे काम जानेवारी २०२८ पासून सुरू होण्याची अपेक्षा असून, त्यातून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच देवगडमधील तरुण प्रांजल कुलकर्णी याची फ्लाय दुबई विमान कंपनीत पायलट म्हणून निवड झाल्याचा उल्लेख करत, देवगडच्या तरुणांमध्ये मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.

देवगडचा विकास आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत, पुढील काळातही विकासकामांसाठी नागरिकांनी साथ आणि आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. देवगडचा कायापालट केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नंदकुमार घाटे, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, गटनेते शरद ठूकरूल, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, इंजिनिअर अभिजित कामत, उल्हास मणचेकर, प्रकाश राणे, महेश ताम्हणकर, सुभाष कुलकर्णी, अजयकुमार सर्वगोड, डॉ. सुनील आठवले, देवगड पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष उगलमुगले आदी उपस्थित होते.

तसेच सार्वजनिक बांधकाम मंडळ तथा सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल, सार्वजनिक बांधकाम विभाग देवगडचे उपविभागीय अभियंता शैलेश मोरजकर, कनिष्ठ अभियंता अविनाश पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!