आपल्या परंपरा व रितीरिवाज यांच्या माध्यमातून विविध गुणदर्शनाचे व्यासपीठ, यासाठी हा सोहळा – तन्वी मोदी
फोंडा, माळवाडी-हवेलीनगर जि.प. शाळेत श्रीसरस्वती पूजन उत्साहात! पालक, विद्यार्थी, शिक्षक वर्गात चैतन्य!
फोंडाघाट (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवात, आठव्या माळेला, प्रत्येक शाळेत विद्येची देवता श्रीसरस्वतीचे पूजन केले जाते. फोंडाघाट, माळवाडी – हवेलीनगर जि.प. शाळेत नातू गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली, सजवलेल्या मखरात, श्रीसरस्वतीचे पूजन शाळेतील एका विद्यार्थ्याच्या हस्ते संपन्न झाले. मोठ्या भक्तिभावाने आरती होऊन काकडी, तवशाचा आणि फळांचा एकत्रित प्रसाद आणि तीर्थ वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्या. माधवी जोशी यांनी उपस्थित पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या विकासात्मक वाटचालीचा आढावा घेताना, त्यांनी शासनाच्या शैक्षणिक योजना आणि पालकांची दक्षता याचे विवेचन केले. त्यानंतर मुला – मुलींनी पालकांसमवेत विविध गुणदर्शनाचा रंगारंग कार्यक्रम सादर केला. विविध गीतावरील नृत्य आणि अंगणवाडीच्या मुलींनी सादर केलेला नाच सर्वांनाच भावला.

दरम्यान फोंडाघाट, ग्रामपंचायत सरपंच संजना आग्रे व सरपंच तन्वी मोदी, ग्रामसेवक मंगेश राणे यांनी सरस्वती मातेचे दर्शन घेतले आणि शुभेच्छा दिल्या. सरस्वती पूजनातून शालेय विद्यार्थ्यांवर आपल्या संस्कृतीचे संस्कार होतात. तसेच आपल्या परंपरा, रीतीरिवाज आणि त्यांच्या माध्यमातून शालेय मुलांना विविध गुणदर्शनाचे व्यासपीठ मिळते, असे उद्गार काढले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उमेश वंजारे, गायत्री इस्वलकर, मिथिल सावंत, सुशांत सापळे, समृद्धी खरात, प्राजक्ता रावराणे, सायली राजम, संतोष देवळी, अनिल राठोड, रणजीत सोलकर, ग्रामस्थ व पालक आरती राज्याध्यक्ष, शिल्पा वालावलकर, सुलभा माळवदे, सौ. सापळे, अंकिता धुरी, पूजा पाटील, चारुशीला चव्हाण, उमा पारकर, संजना पवार, रिया मेस्त्री, तसेच शिक्षक वर्ग मयुरी मेस्त्री, प्राची उरणकर, सुलभा लाड, सुषमा लाड इत्यादी उपस्थित होत्या. पालक संघाने श्री सरस्वतीची मूर्ती शाळेला भेट दिली. प्रस्तावना माधवी जोशी आणि आभार प्रदर्शन शितल बागवे यांनी केले.












