सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील गौण खनिज उत्खननास परवानगी दिलेल्या जागेत अटी शर्तीचा भंग करून अवैध उत्खनन झाले आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांसह दोषींवर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी निरवडे येथील श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील श्रीमती गावडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यात काळा दगड व जांभा दगड उत्खननासाठी जिल्हाधिकारी,तसेच उपविभागीय अधिकारी महसूल सावंतवाडी, तहसीलदार सावंतवाडी, यांच्याकडे त्या त्या अधिकार क्षेत्राप्रमाणे अटी शर्तीच्या अधीन राहून परवाने देण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार सावंतवाडी तालुक्यात उत्खनन होणारे गौण खनिज अटी शर्तीच्या अधीन राहून होत आहे का, याबाबत मंडल अधिकारी कधीही तपासणी करताना दिसत नाहीत व अहवाल दिलेला नाही असे दिसून येत आहे. तसेच या अटी शर्तीचे पालन झाले अगर कसे याची तपासणीही जिल्हाधिकारी अथवा खणीकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी महसूल सावंतवाडी तसेच तहसीलदार सावंतवाडी यांनी कधीच केलेली नाही असे दिसून येत आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील काळा दगड व जांभा दगड उत्खननासाठी परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी अटी शर्तीचा भंग करून उत्खनन होत असल्यास संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. सावंतवाडी तालुक्यात उत्खनन होत असलेली जागा ही सुमारे २०० फूट खोल असून त्या ठिकाणी भराव टाकून बुजविण्यात आलेल्या नाहीत, तसेच कुंपणही करण्यात आलेले नाही. वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही असे असतानाही पुन्हा परवानग्या देण्यात आल्या आहेत. यावरून त्यामध्ये करोडोंचा अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. तरी गौण खनिज उत्खननास परवानगी दिलेल्या जागेच्या इन कॅमेरा चौकशी करून याप्रकरणी दोषींवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी आजपासून सौ श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे












