गोपुरी आश्रमात ‘जागर स्त्री शक्तीचा उत्सव विचारांचा’ कार्यक्रमाचा सांगता समारंभ संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सव म्हणजे केवळ देवीची आराधना नव्हे, तर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या असामान्य कर्तृत्वाच्या स्त्रियांचा गौरव करण्याचा, त्यांच्याप्रती आदर व सन्मान व्यक्त करण्याचा चैतन्यमय सोहळा आहे. याच उद्देशाने गोपुरी आश्रमात आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा उत्सव विचारांचा’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष उत्सवामध्ये प्रत्येक माळ विविध क्षेत्रातील असामान्य कर्तृत्ववान स्त्रियांना समर्पित करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमातील पहिली माळ राजमाता जिजाऊ यांना समर्पित करून त्यांच्या प्रेरणेने सामाजिक एकता प्रस्थापित करून संघटनाच्या आधारे इतरांचाही आपल्या सोबत विकास साधणाऱ्या तन्वीर शिरगावकर आणि राजकीय नेतृत्वातून विकासात्मक बदल करून गावाची प्रगती साधणाऱ्या आफ्रोजा नावळेकर यांचा गौरव करण्यात आला. दुसरी माळ आदिवासी चित्रकार भुरीबाई यांच्या कलेला व श्रमनिष्ठ जीवनाला समर्पित करून त्यांच्या कलेचा वारसा जपणाऱ्या रत्ना सूर्यवंशींचा सत्कार करण्यात आला. तिसरी माळ शिक्षणप्रसारक फातिमा शेख यांना समर्पित करून त्यांच्या शिक्षण सेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या प्रतिभा कोतवाल यांचा सन्मान करण्यात आला. चौथी माळ पर्यावरण चळवळीतील विमला बहुगुणा यांना अर्पण करून यांच्या संघर्षाला प्रेरणा मानून ग्रामविकास घडवणाऱ्या संगीता पाटील यांचा गौरव करण्यात आला. पाचवी माळ प्रखर विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांना अर्पण करून त्यांचा पत्रकारितेचा वारसा जपणाऱ्या पत्रकार अस्मिता गिडाळे यांचा सन्मान करण्यात आला.

सहावी माळ घटना समिती सदस्या दक्षायणी वेलायुधन यांच्या कार्याला समर्पित करून घटनेने दिलेल्या अधिकारामुळे अकाली वैधव्याचा सामना करत मुलांना प्रशासनात जाण्याची संधी निर्माण करणाऱ्या लतिका नाईक यांचा गौरव करण्यात आला. सातवी माळ क्षेपणास्त्र निर्मितीतील ‘मिसाईल वूमन’ टेसी थॉमस यांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाला अर्पण करून हाच वैज्ञानिक वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजवणाऱ्या अमिता सावंत यांचा सत्कार करण्यात आला. आठवी माळ पहिली महिला डॉक्टर रखमाबाई यांच्या वैज्ञानिक सेवेला व लढाऊ वृत्तीला समर्पित करून त्यांच्या प्रेरणेने आरोग्य प्रसार करणाऱ्या योगशिक्षिका श्वेता गावडे यांचा सन्मान करण्यात आला. नववी माळ परिवर्तनवादी नाटककार ज्योती म्हापसेकर यांच्या परिवर्तनवादी विचारांना अर्पण करून आपल्या अभिनयातून आपला समृद्ध परिसर, आपलं आनंदी जीवन सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर अभिव्यक्त करणाऱ्या छाया गावकर यांचा गौरव करण्यात आला. तर सांगता समारंभाच्या दिवशीची दहावी माळ समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या त्यागनिष्ठ कार्याला अर्पण करून त्यांच्याच कार्याला प्रेरणा मानून महसुल विभागात तहसीलदार या अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या चैताली सामंत यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमातून समाजातील सर्वसामान्य स्त्रीचे असामान्य कर्तृत्व, तिचा संघर्ष आणि प्रवास समोर आणून, ‘नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून नवनिर्मितीचा, समतेचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा उत्सव आहे’, असा ठाम संदेश देण्यात आला. गोपुरी आश्रमाने केलेल्या या उपक्रमामुळे समाजात महिलांप्रती आदरभाव वाढावा, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या प्रगतीस हातभार लागू शकेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!