कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग व इंग्लिश स्कूल या तिन्ही विभागाने प्रशालेत मोठ्या उत्साहाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा जागर घडवून आणला. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून व मराठी भाषेतून म. गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन चरित्रांचे विचार आपल्या सुंदर वक्तृत्वातून मांडले.
यावेळी एनसीसी कॅप्टन व विज्ञान शिक्षिका शर्मिला केळूसकर यांनी ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे निवेदन करून मंत्रमुग्ध केले. आपल्या निवदेनातून महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांचा सहज सोप्या भाषेत जीवनपट उलगडून विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या आचरणांचे दर्शन घडवून दिले. इंग्रजी विभागाचे अध्यापक विलास ठाकूर यांनी इंग्लिश भाषेतून दोन्ही महापुरुषांचे विचारदर्शन ओघवत्या शैलीत मांडले. पर्यवेक्षक अच्युतराव वणवे यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांचा तौलनिक विचार मांडून हरितक्रांती व अर्थव्यवस्था ‘जय जवान जय किसान’ या लालबहादुर शास्त्रीच्या विचारांचे दर्शन घडवून आणले. मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी जागतिक स्तरावर म. गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या आचरणांचे पालन करून विकसित देशांचे दर्शन आपल्या विचारातून मांडून देशातील गरीबी ‘अस्पृश्यता’ अंधश्रद्धा आणि पारतंत्र नष्ट करण्यासाठी महात्मा गांधीनी भारतीय समाज मनांचा अभ्यास करून देशाला सामाजिक ऐक्य, समता, स्वातंत्र मिळवून दिले. याविषयी मार्गदर्शन केले.
आभार सांस्कृतिक विभागाच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शिरसा यांनी मानले. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












