धामापूर येथील ज्येष्ठ नागरिक विदुर प्रभू यांचेवर हृदयविकाराची मोफत शास्त्रक्रिया

भाजप कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांनी केले विशेष प्रयत्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धामापूर या गावातील आर्थिक दुर्बल घटकातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक विदुर प्रभू वय ७५ वर्षे हे हृदयविकाराच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते व भाजप पक्षाचे उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा सचिव नामदेव चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने प्रयत्न करून मुंबई येथील नामांकित असलेल्या नानावटी हॉस्पिटल मध्ये प्रभु यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले आहे. तर आता ते या आजारातून पूर्ण बरे झाले असून त्यांची तब्बेत ठणठणीत आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, कणकवली तालुक्यातील पिसे कामते गावचे सरपंच सुहास राणे यांचे बंधू नरेंद्र राणे यांचे सासरे विदुर प्रभु राहणार धामापूर, मालवण हे बरेच दिवस हृदयविकाराच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी अनेक डॉक्टरांकडे नेले असता त्यांच्यावरील शस्त्रक्रिया करणे अवघड असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ही बाब कट्टर राणे समर्थक व सामाजिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांच्या अथक प्रयत्नाने श्री. प्रभु यांच्यावर मुंबई येथील नानावटी हॉस्पिटल मध्ये सुमारे ५ ते ६ लाख रुपये खर्च येणारी मोठी गंभीर हृदयविकारची शस्त्रक्रिया मोफत करून श्री. प्रभु यांना नवे जीवनदान दिले आहे.

माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री तसेच भाजपाचे विद्यमान खासदार नारायण राणे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या आशीर्वादाने कोकण, मुंबई सह महाराष्ट्रातील अनेक गरीब आणि गरजू रुग्णांवर गंभीर आजारावर असणाऱ्या मोठ्या शस्त्रक्रिया मुंबईतील नामांकित हॉस्पिटल मध्ये मोफत केल्या असून याही पुढे करत राहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तर राणे व प्रभू कुटुंबियांनी भाजप कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांची त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर नामदार नितेश राणे यांचे देखील आभार मानले आहेत.

error: Content is protected !!