महिला अधिकाऱ्यांच्या बदनामीप्रकरणी अभय शिरसाट यांच्यावर कारवाई करा!

शिवसेना महिला सेनेच्या जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार; आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या चौकशीची मागणी

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याचा आरोप करीत काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष अभय तुकाराम शिरसाट यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला सेनेच्या जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शुक्रवारी (ता. ६) जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली. संबंधित सोशल मीडिया पोस्टची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ‘जिल्ह्यातील मुख्य प्रशासकीय अधिकारी झाला प्राणी मित्र’ अशा आशयाचे शीर्षक देऊन संबंधित महिला अधिकाऱ्यांबाबत अपमानास्पद, अवमानकारक आणि बदनामीकारक शब्दप्रयोग करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या पोस्टमधून केवळ संबंधित महिला अधिकाऱ्यांचीच नव्हे, तर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही अवहेलना करण्यात आल्याचा आरोप पडते यांनी केला आहे.

प्रशासकीय अधिकारी किंवा त्यांच्या निर्णयांवर लोकशाही मार्गाने टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, टीकेच्या नावाखाली महिला अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणे योग्य नाही. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्रे आणि अवमानकारक टिप्पण्यांच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारांमुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर तसेच प्रशासकीय कामकाजाच्या वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणी संबंधित पोस्टची सखोल चौकशी करावी, ती प्रसिद्ध व प्रसारित करणाऱ्यांची ओळख निश्चित करून डिजिटल पुरावे संकलित करावेत, पोस्टमधील मजकूर, छायाचित्रे व टिप्पण्यांची कायदेशीर तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांविरोधात लागू कायद्यानुसार कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय भविष्यात महिला अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हा प्रश्न केवळ एका महिला अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेपुरता मर्यादित नसून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या सन्मानाशी निगडित आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अशी भूमिका दीपलक्ष्मी पडते यांनी मांडली.

यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, शहराध्यक्षा श्रुती वर्दम, तालुकाध्यक्षा वैशाली पावसकर, तालुका समन्वयक दीक्षा सावंत, नेहा परब, मृणाल परब, सोनल शिरोडकर, महिमा जिकमडे, अपर्णा साहिल, पल्लवी धुरी, सुश्मिता राणे, अर्चना खोत, नेहा खोत, दीपा ताटे आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सोशल मीडिया पोस्टच्या चौकशीसाठी पाच मागण्या

संबंधित सोशल मीडिया पोस्टची सखोल चौकशी, पोस्ट प्रसारित करणाऱ्यांची ओळख निश्चित करणे, डिजिटल पुरावे संकलित करून मजकूर व छायाचित्रांची कायदेशीर तपासणी, दोषींवर कायदेशीर कारवाई आणि भविष्यात अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना, अशा पाच प्रमुख मागण्या शिवसेना महिला सेनेने पोलिस प्रशासनाकडे केल्या आहेत.

error: Content is protected !!