सावंतवाडी बसस्थानकातील १२ तोळे सोन्याच्या चोरीचा छडा!

महिलेसह दोघे संशयित ताब्यात; कणकवलीत सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी बसस्थानकावरून तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी महिलेसह दोन संशयितांना कणकवली तालुक्यातील गडनदी परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. चोरीचे दागिने कर्नाटकात ठेवल्याची माहिती संशयितांनी चौकशीत दिली असून, ते हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सावंतवाडी बसस्थानकावर २१ सप्टेंबर २०२६ रोजी १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून दीपक संतोष सकट (वय २७) आणि अमृता दीपक सकट (वय २१, दोघेही रा. एस. एम. हायस्कूलमागे, किणई, कणकवली) यांचा या चोरीत सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयितांचा शोध सुरू केला. दोघेही कणकवली तालुक्यातील गडनदीनजीक उभादेव मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) तेथे सापळा रचला. त्यानंतर दोन्ही संशयितांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच चोरी केलेले १२ तोळे सोन्याचे दागिने कर्नाटकात ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे चोरीचा छडा लागला असला, तरी दागिने हस्तगत करण्याचे आव्हान अद्याप पोलिसांसमोर आहे. दोन्ही संशयितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, महिला पोलिस हवालदार रुपाली खानोलकर, पोलिस हवालदार जॅकसन घोन्साल्विस आणि पोलिस अंमलदार अमर कांडर यांच्या पथकाने सहभाग घेतला.

चोरीचा छडा लागला; दागिने हस्तगत होणे बाकी!

सावंतवाडी बसस्थानकावरील १२ तोळे सोन्याच्या चोरीप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्यांचा माग काढला. मात्र, चोरीचे दागिने कर्नाटकात ठेवल्याची माहिती पुढे आल्याने आता ते हस्तगत करण्यासाठी पोलिसांना कर्नाटकात तपास करावा लागण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!