पहिल्या टप्प्यात सुमारे ६९ विद्यार्थ्यांना देण्यात आले दाखले
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या छ.शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश व इतर शासकीय लाभांसाठी आवश्यक असणारे वय अधिवास व जातीचे दाखले देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आज जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, अस्ताली पवार,खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर,समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे,उमेश गुरव,खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक व या अभियानाचे नोडल ऑफिसर प्रदीप श्रावणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते खारेपाटण जि.प.केंद्रशाळा नं.१ या शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या सुमारे १३३ पैकी ६९ विद्यार्थ्यांना वय अधिवास व जातीच्या दाखल्यांचे आज वाटप करण्यात आले.तर उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात दाखल्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी शाळेच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व पालकांचे देखील स्वागत शाळेच्या शिक्षिका आरती जोजेन यांनी केले. यावेळी उपस्थित पालकांकडे हे अत्यावश्यक दाखले काळजीपूर्वक सुपूर्द करण्यात आले.
“दी.१७ सप्टेंबर ते दी.२ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत जाहीर करण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमात शासनाच्या वतीने अगदी कमी वेळेत आणि फक्त काही थोडक्या मर्यादित पुराव्यांच्या आधारे सर्वात कमी खर्चात देण्यात आलेले हे दाखले विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असून या दस्तऐवजाचे विद्यार्थी व पालकांनी नीट जतन करून ठेवावे.सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात राबविलेले अभियान सर्व सामान्य पालकांना दिलासा देणारे असून प्रशासनाचे हे काम गौरवास्पद असल्याचे असे भावपूर्ण उदगार यावेळी शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना काढले.तर सरपंच प्राची ईसवलकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक मिलिंद सरकटे,शीतल राठोड,आरती जोजेन,समीधा राऊत,लोके मॅडम, चव्हाण मॅडम वअबीदा काझी यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केले.












