कणकवली (प्रतिनिधी) : आरोपी अनिल कृष्णा आंगणे यांनी फिर्यादी बँकेला दिलेले ५० लाख रुपयांचे दोन चेक अनादरीत झाले प्रकरणी प्रत्येक खटल्यात ७० लाख रुपये याप्रमाणे आरोपीकडून एकूण एक कोटी चाळीस लाख रुपये वसुलीचे आदेश करण्यात आले आहेत. फिर्यादी बँकेतर्फे ॲडवोकेट दीपक अंधारी यांनी काम पाहिले.
फिर्यादी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली यांचेकडून आरोपी अनिल कृष्णा आंगणे सध्या राहणार मुंबई यांनी विविध कारणांसाठी एक कोटी पेक्षा अधिक रक्कम कर्जाऊ घेतली होती. सदर रकमेची परतफेड आरोपी हे फिर्यादी बँकेकडे योग्य मुदतीत करत नव्हते, त्यामुळे कर्ज खाते एनपीए झाले होते. आरोपीने फिर्यादी बँकेकडे बंगला-इमारत इत्यादी तारण ठेवले होते. सदर इमारत कर्जप्रकरणी लिलाव होऊ नये म्हणून अंशतः रक्कम कर्ज फेड करण्याकरिता आरोपीने फिर्यादी बँकेकडे ५० लाख रुपयांचे दोन चेक अदा केले होते. परंतु खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदर दोन्ही चेक न वटता परत आले, त्यामुळे फिर्यादी बँकेने नोटीस इत्यादी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून सदर दोन्ही चेक अनादरीत झाले प्रकरणी आरोपी विरुद्ध, सन २०१८ मध्ये चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा कलम १३८ अन्वये प्रत्येकी ५० लाख रुपये वसुली करिता व आरोपीस दंड शिक्षा होण्यासाठी दोन खटले दाखल केले होते.
सदर दोन्ही खटल्याचे कामी फिर्यादी तर्फे पुरावे साक्षीदार कागदपत्र शाबीत करण्यात आले, दोन्ही खटल्यामध्ये फिर्यादी बँकेच्या वतीने एडवोकेट दीपक आत्माराम अंधाऱी यांनी मुद्देसूद युक्तीवाद केला. आरोपीने घेतलेला बचाव अयशस्वी ठरला. आरोपी विरुद्ध दाखल पुरावे कागदपत्रांचा मेहरबान कोर्टाने गुणदोषावर विचार करून आरोपीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट चे १८८१ चे कलम १३८ अन्वये गुन्हा केल्याचे शाबीत झाल्याने प्रत्येक खटल्यात आरोपीस स्वतंत्ररीत्या शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी यास १८ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली तसेच आरोपीस प्रत्येक केस मध्ये सत्तर लाख रुपये दंड रकमेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यापैकी ६५ लाख रुपये फिर्यादी बँकेस नुकसान भरपाई व व पाच लाख रुपये सरकारला भरणा करण्यासंदर्भात हुकूम करण्यात आला. सदर दंडाची रक्कम आरोपीने भरणा न केल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल, असा हुकूम कणकवली न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. एस. जी. लतुरिया यांनी केले आहेत.












