छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत ‘स्वराज्याचा सागरध्वज’ भव्य सांस्कृतिक सोहळा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

सांस्कृतिक कार्यक्रमातून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात

आमदार प्रमोद जठार आहेत कार्यक्रमाचे संकल्पनाकार

मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा, स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा आणि मराठी संस्कृतीच्या वैभवाचा जागर घडविणारा ‘स्वराज्याचा सागरध्वज’ हा भव्य सांस्कृतिक सोहळा बुधवार २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी दिनानिमित्त या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना या कार्यक्रमातून मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक सोहळ्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सादरीकरणासोबतच संहितालेखन, संगीत, गायन, ध्वनी संयोजन, प्रकाशयोजना आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाचा भव्य आविष्कार सादर केला जाणार आहे. अंबर हडप यांचे संहितालेखन, मंदार खर्डे यांचे निवेदन, कमलेश भडककर यांचे संगीत संयोजन, तसेच केतकी भावे जोशी, स्वरा जोशी, नचिकेत देसाई, जितेंद्र तुपे, विद्या करलगिकर आणि नरेंद्र उमप यांचे गायन या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमाचे संकल्पनाकार आमदार प्रमोद जठार, संयोजक सुहास आदिकरकर, तर विनीत म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर काम पाहत आहेत. विशेष म्हणजे, या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचा सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक स्मरण, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा सोहळा रंगणार असून, नागरिकांनी सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

error: Content is protected !!