खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्या वतीने दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्पे या गावातील शेर्पे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हिदायत नासीरुद्दीन आत्तार यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि. २५ ते २६ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स विद्यानगर कराड, जि. सातारा येथे संपन्न होणाऱ्या मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये दि. २६ ऑक्टोंबर २०२५ रोजी स. ११.३० वाजता मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
शेर्पे हायस्कूलचे मुख्याध्यापक हिदायत अत्तार हे गेली २० वर्षापासून अधिक काळ शेर्पे हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असून शेर्पे हायस्कुलचा १०० टक्के निकाल लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या बरोबर गावातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात देखील त्यांचा सहभाग असून खारेपाटण येथे १० वी, १२ वी बोर्ड परीक्षा केंद्राचे चीप कंडक्टर म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची मुख्याध्यापक राज्य संघटनेने दखल घेऊन त्यांना यावर्षीच्या राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शेर्पे शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वातीने तसेच गावच्या सरपंच स्मिता पांचाळ, माजी सरपंच निशा शेलार, शेर्पे ग्रामस्थ व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यशवंत कांबळे, खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी विशेष अभिनंदन केले आहे.











