खुन्यांपर्यंत पोलिसांचे हात पोचले ; लवकरच होणार अटक
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील साळीस्ते येथे आढळलेल्या डॉ.श्रीनिवास रेड्डी (५३, बेंगलोर, कर्नाटक) यांच्या मृतदेह प्रकरणाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. घटनेला काही दिवस उलटूनही कणकवली पोलिसांनी या तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. मात्र, पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही केस ‘हाय प्रोफाईल’ असून, खून झालेले रेड्डी हे उच्चशिक्षित डॉक्टर तर खुनाचे संशयित देखील ‘बडे असामी’ असल्याची चर्चा होत आहे.
गुरुवारी साळीस्ते येथे एक अज्ञात मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्रांचे अनेक वार होते. याच दिवशी दोडामार्ग येथे रक्ताचे डाग असलेली एक बेवारस कारही सापडली होती. पोलीस तपासानंतर ही कार श्रीनिवास रेड्डी यांच्याच नावे असल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून पोलिसांनी श्रीनिवास रेड्डी यांच्या नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कणकवलीत बोलवले होते. मात्र मृतदेहाच्या चेहरा काळा पडला असल्याने ओळख पटवणे शक्य होत नव्हते. परंतु हा मृत्यू श्रीनिवास रेड्डी यांच्याशी मिळता जुळता असल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) विभागाची दोन विशेष पथके तातडीने कर्नाटक राज्यात रवाना झाली आहेत
पोलिसांनी तातडीने कर्नाटकातील दोन व्यक्तींना कणकवलीत बोलावून घेतले होते. त्यांच्या पाहणीनंतरच मृतदेह डॉ. रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, हे महत्त्वाचे साक्षीदार कोण होते, हे सांगण्यासही पोलिसांनी स्पष्ट नकार दिला आहे.
शनिवारी डॉ. रेड्डी यांचे काही नातेवाईक कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली, मात्र त्याबद्दलही मौन बाळगले आहे. डॉ. रेड्डी हे बेंगलोरचे उच्चशिक्षित डॉक्टर असून, त्यांचा खून दोडामार्ग किंवा अन्य ठिकाणी करून मृतदेह साळीस्तेसारख्या दुर्गम भागात का टाकण्यात आला, हा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये आणि पोलीस दलातही चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी अत्यंत सावध पवित्रा घेतल्यामुळे या खुनाचे गुढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. लवकरच या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












