शेर्पे हायस्कूलचे मुख्याध्यापक हिदायात अत्तार यांचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्या वतीने दिला जाणाऱ्या ‘राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी’ यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्पे या गावातील शेर्पे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हिदायत नासीरुद्दीन आत्तार यांची निवड झाली होती. नुकताच त्यांचा शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा दि.२६ ऑक्टोबर, २०२५ रोजी श्री. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स विद्यानगर कराड, जि.सातारा येथे संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शेर्पे हायस्कूलचे मुख्याध्यापक हिदायत अत्तार यांना हा पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी शिक्षक आमदार व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, मुख्याद्यापक संघटनेचे अध्यक्ष तानाजी माने, उपाध्यक्ष सचिन नलावडे, सचिव नंदकुमार माने तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईचे पदाधिकारी व रयत शिक्षण संस्था सातारा संघटक डॉ. अनिल पाटील, मुख्याध्यापक महामंडळ माजी अध्यक्ष जे. के. पाटील, यशवंतराव चव्हाण कॉलेज कराडचे प्राचार्य डॉ.सूर्यकांत केंकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शेर्पे हायस्कूलचे मुख्याध्यापक हिदायत अत्तार हे गेली २० वर्षापासून अधिक काळ शेर्पे हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असून शेर्पे हायस्कुलचा १०० टक्के निकाल लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याबरोबर गावातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात देखील त्यांचा सहभाग असून खारेपाटण येथे १०वी १२वी बोर्ड परीक्षा केंद्राचे चीप कंडक्टर म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची मुख्याध्यापक राज्य संघटनेने दखल घेऊन त्यांना यावर्षीच्या राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल शेर्पे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय शेलार, उपाध्यक्ष सुनिता शेलार, संस्था सचिव यशवंत कांबळे, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, माजी सरपंच निशा गुरव आदी मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!