सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग

सावडाव डगरेवाडी येथे गणपती मंदिरात ज्ञाती बांधवांची पहिली गावभेट बैठक ;समाजाच्या एकजुटीची ताकद ओळखून संघटित होण्याचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्ह्यात समाजाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आता गावपातळी, विभागपातळी तसेच तालुकास्तरावर बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे समाजातील प्रत्येक ज्ञाती बांधवापर्यंत पोहोचून समाजाची एकजूट, संघटन आणि सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याच नियोजनाचा एक भाग म्हणून गुरुवारी रात्री कणकवली तालुक्यातील सावडाव डगरेवाडी येथील गणपती मंदिरात ज्ञाती बांधवांची पहिली संवाद बैठक पार पडली.

यावेळी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रामदास विखाळे, सरचिटणीस भगवान लोके, संघटक स्वप्निल चिंदरकर, आतिष जेठे, सचिन आचरेकर, यावेळी भास्कर डगरे, गणपत आचरेकर, प्रदीप आचरेकर, दिगंबर फाटक , गणपत कोरगांवकर, आत्माराम कुबल, अक्षय हडकर यांच्यासह
सावडाव गावातील ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाज संघटित असेल तर कोणत्याही सामाजिक प्रश्नावर एकत्रितपणे आवाज उठवता येतो. अडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता येते. तरुण पिढीला योग्य दिशा देता येते आणि समाजाच्या हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करता येतो. याउलट समाज असंघटित राहिल्यास आपली सामूहिक ताकद कमी होते, समाजाचे प्रश्न दुर्लक्षित राहतात आणि त्याचा परिणाम भविष्यातील पिढ्यांवरही होऊ शकतो, याबाबत उपस्थित न्याती बांधवांना जिल्हाध्यक्ष रामदास विखाळे यांनी मार्गदर्शन केले.

सरचिटणीस भगवान लोके म्हणाले, आपल्या मुंबई येथील मुख्य संस्थेच्या इमारती स्वप्निल फाटक यांनी 9 ऑक्टोंबरला ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रसाद लाड संस्थेचे अध्यक्ष झाल्याचे फलकही लावण्यात आले होते. डॉ. रामचंद्र शिरोडकर व आपल्या समाजातील अनेक ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्वांनी क्षा.म,समाज संस्था उभी करण्यासाठी काम केले आहे. त्यामुळे संघटित करण्याची आवश्यकता, समाजासमोर उभी असलेली विविध संकटे, भविष्यातील आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली सामूहिक ताकद आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने संघटनेशी जोडले जाणे आवश्यक आहे.

मुंबईत आपली संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भविष्यात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आपण तयारी ठेवूया ,समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण संघटीत झालं पाहिजे. प्रत्येकाने समाज संघटित होण्यासाठी योगदान दिले पाहिजे, त्या दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागूयात ,असे आवाहन स्वप्निल चिंदरकर , आतिष जेठे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सावडाव येथील ज्ञाती बांधवांनी समाजातील प्रश्नांबाबत चर्चा केली. आणि आगामी काळात आलेल्या प्रश्नांबाबत एकजुटीने लढण्याचा निर्धार केला.

error: Content is protected !!