खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक मतदार संघात इच्छुक उमेदवारांची नावे आता हळूहळू पुढे येऊ लागली असून खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून खारेपाटण संभाजी नगर येथील पक्षाचे युवा कार्यकर्ते निखिल कृष्णा गुरव हे इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात देखील इच्छुकांची भाऊगर्दी आता वाढताना दिसत आहे.
निखिल कृष्णा गुरव हे खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक सतीश गुरव यांचे धाकटे बंधू असून या दोन्ही बंधूंनी काही महिन्यापूर्वी एका आपल्या सहकारी कार्यकर्त्यांनसह उबाठा शिवसेना पक्षाचा त्याग करून भाजपा मंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथे एका कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळे पासून सतीश गुरव व त्यांचे बंधू निखिल गुरव हे भाजप पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून खारेपाटण मध्ये काम करत असून येत्या पंचायत समिती निवडणुकीत खारेपाटण मतदार संघातून आपण निवडणुकीला उभे राहणार असल्याचे निखिल गुरव यांनी सांगितले.
तर सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांचा मतदार संघात जनतेशी असलेला थेट सबंध व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून समाजात असलेली त्यांची ओळख त्यांचे बंधू निखिल गुरव यांना येत्या निवडणूक फायद्याची ठरू शकते असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाला इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघात उमेदवाराची अंतिम निवड करताना मोठी कसरत करावी लागणार आहे एवढे निश्चित.











