आम्हीच खरे गोरक्षक ! दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दावा !

शेतकऱ्यांकडून दुधाळ जनावरे वाहतुकीसाठी दूध संस्थांचा दाखला ग्राह्य धरावा अशी आग्रही मागणी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दुधाळ जनावरे वाहतूक करण्यासाठी यापूर्वी स्थानिक दूध उत्पादक शेतकरी संस्थेचा दाखला ग्राह्य धरला जात होता. मात्र तो आता चालणार नाही, असे पोलीस चेक पोस्टवर सांगण्यात येते. आता दाखला ग्रामपंचायतचा अथवा पोलीस पाटील यांचा ग्राह्य धरला जातो. वस्तुतः सुट्टीच्या दिवशी दाखले मिळणे करिता शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागतात व त्रास सहन करावा लागतो. शिवाय त्यांना भाकड व दुधाळ जनावरांची पारख ही नसते. तथाकथित गोरक्षक गाड्या अडवून नाहक त्रास देतात. त्यांचे वर सुद्धा कार्यवाही होणे कारवाई होणे गरजेचे आहे.

तरी पूर्वीप्रमाणे दुधाळ जनावरांच्या वाहतुकीसाठी दूध उत्पादक संस्थेचे दाखले ग्राह्य धरण्यात यावेत,याकरिता दशक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील रॅली काढून सर्वांचेच लक्ष वेधले.त्यानंतर शांताराम मंगल कार्यालय येथे झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी वाहतूक परवाना मागणीस एकमुखी पाठिंबा व्यक्त केला. आम्हीच खरे गोरक्षक ! असल्याचा दावा करताना,कणकवली पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.त्याची प्रत प्रताप सरनाईक,परिवहन मंत्री. नितेश राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग व सेना उपनेते संजय आग्रे यांना पाठविण्यात आली आहे. यावेळी मिथिल सावंत, मंदार भिसे, मारुती देवगडकर, अर्जुन पवार, तेजस बोभाटे, राजेश निकम, अभिषेक बाणे, सचिन ठाकूर, सिद्धेश बाणे, अभिनव राणे, केतन तिरोडकर यासह असंख्य शेतकरी फोंडाघाट, जाणवली, कोंडये, कानडेवाडी, सातरल, नांदगाव, हरकुल, वागदे, आचिर्णे ,वाघेरी, तोंडवली, करूळ, कसवण इत्यादी तालुक्यातील गावातून उपस्थित होते.

error: Content is protected !!