मुंबई (प्रतिनिधी) : अखेर राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या होत्या. आता राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
- नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात : १० नोव्हेंबर
- नामनिर्देशनाची अंतिम तारीख : १७ नोव्हेंबर
- छाननी : १८ नोव्हेंबर
- माघारीची तारीख (अपील नसल्यास) : २१ नोव्हेंबर
- माघारीची तारीख (अपील असल्यास) : २५ नोव्हेंबर
- चिन्ह वाटप व अंतिम यादी : २६ नोव्हेंबर
- मतदान : २ डिसेंबर
- मतमोजणी व निकाल : ३ डिसेंबर
या घोषणेसह राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचार मोहिमेच्या तयारीला वेग दिला आहे.












