ब्युरो न्यूज : देशाची राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या संवेदनशील आणि ऐतिहासिक अशा लाल किल्ला परिसरात स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर 1 च्या बाहेर पार्किंगमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटानंतर गाडीला भीषण आग लागली. आग इतकी मोठी होती की, बाजूच्या दोन गाड्यांनादेखील आग लागली. गाडीत स्फोट झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज आला. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. परिसरातील दुकानांची काचे फुटली. हा परिसर अत्यंत रहदारीचा परिसर आहे. इथे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची यावेळी गर्दी असते. गर्दीच्या वेळी हा स्फोट झाल्याने हा दहशतवादी कट होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्मिशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच आणखी गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेनंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून सर्व परिस्थिती हातळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे, पण या स्फोटात गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून संबंधित परिसर खाली करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.











