नागाळा पार्क परिसरात घुसला बिबट्या, परिसरात भीतीचं वातावरण

बिबट्याचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात बिबट्या आल्याची चर्चा मध्यरात्रीपासून होती. बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाकडून शोध मोहीम सुरू होती. मात्र बिबट्या वनविभागाला चकवा देत होता. मंगळवारी दुपारी विवेकानंद महाविद्यालयासमोर घरकाम करताना महिलांना बिबट्याचं दर्शन झालं. याबाबतची माहिती मिळताच कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस घटनास्थळी झाले. यानंतर वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेण्याचं काम चालू होतं. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मात्र झाडावर लपून बसलेल्या बिबट्यानं थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला.

नागाळा पार्क परिसरात भीतीचं वातावरण :

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कृष्णात पाटील यांच्यावर बिबट्यानं हल्ला चढवला. यावेळी ते जमिनीवर कोसळले. हातात असलेल्या काठीनं त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर बिबट्या पुन्हा झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता. कोल्हापूर पोलीस दल आणि वनविभागाच्या वतीनं बिबट्याला शोधण्याचं काम सुरू असून उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्या नागाळा पार्क परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

बिबट्याच्या हालचालींवर नजर :

या घटनेनंतर वनविभागानं संपूर्ण परिसर सील केला असून बिबट्याचा शोध सुरू आहे. रात्रीपासूनच वनकर्मचारी, पोलीस आणि स्थानिक प्रशासन संयुक्तरीत्या या परिसरात गस्त ठेवत आहेत. विवेकानंद कॉलेज परिसर, वूडलँड हॉटेल, बीएसएनएल ऑफिस आणि महावितरण परिसर या सर्व ठिकाणी बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे.

नागरिकांना खबरदारीचा इशारा :

नागाळा पार्क परिसरातील नागरिकांसह शहरातील रहिवाशांना वनविभाग आणि पोलिसांकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर न जाण्याचं, गर्दी न करण्याचं आणि रात्री बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

error: Content is protected !!