कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे येथील धरणात एका युवक व एका अल्पवयीन युवतीने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण कणकवली तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. मृतांमध्ये २२ वर्षीय युवक कलमठ गावातील असून अल्पवयीन युवती नजीकच्या शहरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोघांनी नेमके कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास अद्याप सुरू आहे.
मंगळवारी दुपारी सदर युवकाचा मोबाईल हरवला होता. त्यानंतर तो सायंकाळच्या सुमारास चुलत्याची दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.
स्वतःचा मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे युवकाने आईचा मोबाईल वापरून एका युवतीशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. त्याच्या मोबाईलवरील मेसेज वाचल्यानंतर कुटुंबीय रात्री तरंदळे धरण परिसरात पोहोचले. शोध घेत असताना धरणाच्या पाण्यात युवक व युवतीचे मृतदेह आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पहाटे सुमारे ५ वाजता दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पुढील तपासणीसाठी मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणी युवकाच्या चुलत्याने दिलेल्या तक्रारीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.











