नितेश राणेंच्या सूचनेनंतर तारामुंबरी संस्थेची इमारत सुरक्षित
देवगड (प्रतिनिधी) : तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्था, देवगड यांच्या इमारतीवरील धोकादायक आंब्याच्या झाडाच्या फांद्या तोडून तातडीचा धोका दूर करण्यात आल्याबद्दल संस्थेच्या वतीने मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले आहेत.
देवगड तालुक्यातील खालची बाजारपेठ परिसरात संस्थेची स्वतःची इमारत असून, सदर इमारतीच्या छतावर शेजारील गणेश दिगंबर गावकर यांच्या आंब्याच्या झाडाच्या मोठ्या फांद्या आलेल्या होत्या. या फांद्या इमारतीवर कोसळण्याची शक्यता असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. याबाबत संस्थेच्या वतीने गेली २ वर्षे देवगड जामसंडे नगरपंचायत तसेच देवगड तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहाराद्वारे संबंधित मालकाशी वारंवार पत्रव्यवहार करून सादर झाडाच्या फांद्या तोडण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र फांद्या तोडण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संस्थेने याप्रकरणी मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्याकडे तक्रार केली होती.
नामदार नितेश राणे यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत संबंधित यंत्रणांना आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार झाडाचे मालक गणेश दिगंबर गावकर यांनी दिनांक ६ डिसेंबर रोजी संस्थेच्या इमारतीवरील धोकादायक आंब्याच्या झाडाच्या फांद्या तोडून इमारतीवरील धोका दूर केला.
या कार्यवाहीमुळे संस्थेची इमारत सुरक्षित झाली असून संभाव्य दुर्घटना टळली आहे. याबद्दल तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेच्या वतीने नामदार नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले आहेत.











