पहिला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट यांना जाहीर
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्ट यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, लेखक महेश काणेकर यांनी केली. त्यामध्ये पहिला कलातपस्वी आप्पा काणेकर जीवनगौरव पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, सहकार या क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट यांना जाहीर करण्यात आला असून यावेळी इतर विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
पुरस्कार घोषणा करताना ट्रस्टचे प्रशांत काणेकर, प्रसिध्दी प्रमुख निकेत पावसकर, संपादक प्रकाश केसरकर, राजेश कदम आदी उपस्थित होते. इतर पुरस्कारांमध्ये कै. सौ. उमा काणेकर आदर्श शिक्षिका पुरस्कार विधी मुद्राळे तर उपक्रमशील पुरस्कार स्वाती पाटील यांना, कलातपस्वी आप्पा काणेकर बालसाहित्य सेवा पुरस्कार विठ्ठल कदम, कला गौरव पुरस्कार प्रसाद राणे, समाजभूषण पुरस्कार संजय आंग्रे, साहित्य वैभव पुरस्कार गौरव खतकल्ले यांना जाहीर करण्यात आले आहेत.
हा पुरस्कार वितरण समारंभ 25 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकणचे साहित्यिक डाॅ. राम मेस्त्री, शिवारबाचे संपादक प्रकाश केसरकर यांच्या उपस्थितीत कणकवली नगरवाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
गेली 16 वर्षे या ट्रस्टच्या माध्यमातून विविध पुरस्कार देऊन त्या व्यक्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच, शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ दिले जात आहे. अस्सल कलाकार असलेल्या कलाकारांना आणि देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शाल, श्रीफळ, ग्रंथभेट आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
याशिवाय, यावर्षी सद्भावना सत्कार म्हणून पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुधीर राणे (कणकवली), कला, सांस्कृतिक कार्यातील योगदानाबद्दल उदय दुधवडकर (बुरंबावडे, ता. देवगड), लोकसंगीत सेवेबद्दल बुवा संदीप परब (चिंदर, ता. मालवण) यांनाही यावेळी विशेष गौरविण्यात येणार आहे. तसेच, गुणवंत विद्यार्थी म्हणूनही काही विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार असून ट्रस्ट मार्फत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना यावेळी गौरविण्यात येणार आहे.
कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्ट पुरस्कार छायाचित्र:
- बाबुराव शिरसाट
- विधी मुद्राळे
- स्वाती पाटील
- विठ्ठल कदम
- प्रसाद राणे
- संजय आंग्रे
- गौरव खतकल्ले
सद्भावना सत्कार छायाचित्र:
- सुधीर राणे
- उदय दुधवडकर
- बुवा संदीप परब












