सावंतवाडी (प्रतिनिधी) : अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले द्वितीय यांना सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपावंत होऊन प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचे आगमन मंगळवार, १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये होणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांतील भाविकांसाठी आयोजित ‘दिव्य दर्शन’ दौऱ्यांतर्गत या पादुका सावंतवाडीत येत आहेत.
हा पवित्र सोहळा सावंतवाडी संस्थानचे विद्यमान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले तृतीय व श्रीमंत संयुक्ताराजे भोसले यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः आपल्या हस्ते या ऐतिहासिक पादुका मालोजीराजे द्वितीय यांना प्रदान केल्या होत्या.
६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात सातारा, फलटण, मिरज, सांगली, मुधोल, होंडा, पणजी आदी शहरांनंतर सावंतवाडी येथे पादुकांचे आगमन होत आहे. १६ डिसेंबर रोजी राजवाड्यात विधिवत पूजा झाल्यानंतर सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत दरबार हॉलमध्ये भाविकांसाठी दर्शन खुले राहणार आहे. सावंतवाडी, कोकण व गोवा परिसरातील सर्व स्वामी भक्तांनी या दिव्य दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी राजघराण्याकडून करण्यात आले आहे.












