घोणसरी बोंडगवाडी रोडवर बिबट्याच्या वास्तव्याने घबराट

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट नजीक घोणसरी गावातील पिंपळवाडी – बोंडगवाडी रोड परिसरात बिबट्याचे बछड्यासह वास्तव्य असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.वनविभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्या पकडावा अथवा आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी सरपंच प्रसाद राणे तसेच पोलीस पाटील भालचंद्र राणे यांनी वनअधिकाऱ्यांकडे केली आहे. घोणसरी गावातील पिंपळवाडी हून बोंडगवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर  सती मंदिर पासून काही भाग हा निर्मनुष्य आहे. याच सतिमंदिर परिसरात सायंकाळी साडेसात ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान बिबट्याचे बछड्यांसह दर्शन होत आहे.रात्री 8 वाजल्यानंतर  बोंडगवाडी भागातील ग्रामस्थांना या मार्गावरून  ये जा करणे कठीण होऊन बसले आहे. बिबट्याच्या भितीने ग्रामस्थ जीव मुठीत धरून तातडीच्या कामासाठी या भागातून प्रवास करतात. सोमवारी पहाटे सती मंदिर पारिसरातच बिबट्याने वन्यप्राण्याची शिकार केल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

बोंडगवाडी लगतच  सह्याद्री च्या डोंगररांगा आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना नेहमीच जंगली श्वापदांचे भय असते. त्यातच थेट मनुष्यवस्तीलगत  बिबट्याच्या बछड्यासह असलेल्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

error: Content is protected !!