खारेपाटण (प्रतिनिधी) : ज्युनिअर कॉलेज खारेपाटणचे माजी विद्यार्थी व प्रकाश आयुर्वेद मेडिकल कॉलेज, ग्रेटर नोएडा, दिल्ली NCR चे प्राचार्य डॉ. जगन्नाथ केशव हरयाण यांनी नुकतीच खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. हरयाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा परीक्षा व त्यानुषंगाने निर्माण होणाऱ्या करिअर संधी याविषयी शालेय विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन कार्यशाळा खारेपाटण ज्युनियर कॉलेज येथे घेण्यात आली.
डॉ. जगन्नाथ केशव हरयाण हे खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे सन २००१-०२ या वर्षातील बारावी सायन्स बॅच चे विद्यार्थी असून त्यांनी आपले बी. ए. एम. एस. चे शिक्षण बेळगाव येथे रुरल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे पूर्ण केले. त्यानंतर व्यंकटेश्वरा आयुर्वेद मेडिकल कॉलेज, तिरुपती येथे त्यांनी एम.डी. पदवी प्राप्त केली. राष्ट्रीय स्तरावरील नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन ते सध्या पीएचडी करत आहेत. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असणारे डॉ. जगन्नाथ हरयाण यांनी प्रयत्न व चिकाटीच्या बळावर मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य पदापर्यंतची झेप घेतली आहे. डॉ. हरयाण यांच्यासारखे असामान्य व्यक्तिमत्व खारेपाटण पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श असेल असे मत प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी आपल्या मनोगतात यावेळी व्यक्त केले.
डॉ. जगन्नाथ हरयाण यांनी भविष्यातील बदलणारी शिक्षण पद्धती व स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटीच्या जोरावर आपले ध्येय निश्चित केल्यास यश हमखास मिळते, असे सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील करिअरच्या विविध संधी त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता अशा विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी डॉ. जगन्नाथ हरयाण यांजकडून प्रशालेसाठी रु.७०००/- रुपये देणगी देण्यात आली.
खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी व प्रकाश आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. जगन्नाथ केशव हरयाण यांचे प्रशालेच्या वतीने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सर्व विश्वस्त, तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी अमोल तळगावकर, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉक्टर जगन्नाथ हरयाण यांचे बंधू व खारेपाटण हायस्कूलचे सहा. शिक्षक लक्ष्मीकांत हरयाण, जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. पाताडे यांनी केले तर आभार शाळेच्या शिक्षिका सौ. महिंद्रे यांनी मानले. यावेळी मार्गदर्शन कार्यशाळेला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.










