पोस्टल मतमोजणीत भाजप-श्रद्धाराजे भोसले आघाडीवर
सावंतवाडी (प्रतिनिधी) : अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येत असून, त्यानंतर मतदान यंत्रांमधील मतांची मोजणी केली जाणार आहे. प्राथमिक टप्प्यातील पोस्टल मतमोजणीत भाजपसह श्रद्धाराजे भोसले आघाडीवर असल्याची माहिती आहे.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तहसीलदार कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी स्वतः मतमोजणी केंद्राची पाहणी करून ड्युटीवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागल्याने प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख आणि काटेकोर नियोजन केले आहे.










