सावंतवाडी नगराध्यक्षपदी श्रद्धा भोसले विजयी; ७४५ मतांनी घवघवीत यश

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार श्रद्धा भोसले यांनी ७४५ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे सावंतवाडी शहरात भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

या निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) नीता कवीटकर, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या सीमा मठकर तसेच काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांना पराभवाचा सामना करावा लागला. मतमोजणी प्रक्रिया कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली असून, निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळी सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मतदान यंत्रांमधील मतांची मोजणी सुरू झाली. सुरुवातीपासूनच श्रद्धा भोसले यांनी आघाडी घेतली होती आणि प्रत्येक फेरीत त्यांनी आपली आघाडी कायम ठेवत विजय सुनिश्चित केला.

या निवडणुकीकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी स्वतः मतमोजणी केंद्राची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

विजयानंतर श्रद्धा भोसले यांनी मतदारांचे आभार मानत, “सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल,” असे सांगितले. त्यांच्या या विजयामुळे सावंतवाडीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!