बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

११.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

बांदा (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बांदा येथे मोठी कारवाई करत गोव्यातील अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. या कारवाईत सुमारे ११ लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रवीण महावीर बोराडे (वय ३०, रा. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत ३ लाख ६८ हजार ६०० रुपयांचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य तसेच ८ लाख रुपये किमतीचा टाटा इंट्रा टेम्पो असा एकूण ११ लाखांहून अधिकचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बांदा येथील हॉटेल विवा क्लासिक समोर इन्सुली तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. गोव्याकडून एक पांढऱ्या रंगाचा टाटा इंट्रा टेम्पो संशयास्पदरीत्या येत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास वाहनाची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान वाहनाच्या मागील हौद्यामध्ये अत्यंत शिताफीने चोरकप्पा तयार करून त्यावर सिमेंटच्या विटा रचण्यात आल्या होत्या. त्या विटांच्या खाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ३६ बॉक्स लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख व अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे केली.

error: Content is protected !!