चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला, वाणिज्य संयुक्त (स्वयंअर्थसहाय्यित) कनिष्ठ महाविद्यालय काळसे या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन विनोद वसंत गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ ऊर्फ बाबलो पिंटो आणि महाराष्ट्र शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य संघटक, अजय मधुकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष योगेश राऊळ, सचिव अनंत परब, खजिनदार जयवंत केळूसकर, संचालक शरद गोसावी, उमेश प्रभु, शिवनंदन प्रभु, डाॅ. शरदचंद्र काळसेकर, माजी सचिव केशव सावंत, मुख्याध्यापक अविनाश परब, माजी मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर, सुवर्ण काळसेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच शालेय क्रीडा महोत्सवातील विजेत्या स्पर्धक विद्यार्थी विद्यार्थिनींना पारितोषिके देण्यात आली. तसेच तालुका आणि विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनाही संस्थेतर्फे पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद गोसावी आणि प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात सूत्रसंचालन सोनाली प्रभू यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश कांबळे यांनी केले. सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ संस्थेचे चेअरमन विनोद गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध कलादर्शनपर कार्यक्रम सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेच्या वतीने सादर झालेल्या समूह नृत्यामध्ये प्रथम तीन क्रमांक निवडून त्यांना रोख पारितोषिके देण्यात आली तसेच माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीनेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख बक्षिसे देण्यात आली. सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका, सायली मोरे यांनी केले.












