गोपुरी आश्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘सावित्रीचा जागर’ उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या सामाजिक कार्याची पुनीत झालेल्या गोपुरी आश्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांची १९५वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘सावित्रीचा जागर’ हा कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांची शोधगाथा गायनाने करण्यात आली. या प्रसंगी गोपुरी आश्रमाच्या परिवरांनी आणि उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर केला. समता, सहजीवन आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार समजून घेऊन तो कृतीत उतरवण्याचा संकल्प या अभिवादन कार्यक्रमातून करूया, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

अंधश्रद्धा, अन्याय व भेदभावाविरुद्ध संवेदनशीलतेने पण सजगपणे आवाज उठविणे म्हणजेच सावित्रीबाई व ज्योतिबांच्या सामाजिक संघर्षाची आठवण कृतीतून जपणे होय,आज स्त्री-पुरुषांनी आपले कार्य केवळ कुटुंबापुरते न ठेवता समाजाभिमुख करावे. कुटुंबहितासोबत समाजहित जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणूस घडविण्याची शिकवण सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्याकडून मिळते आणि त्या शिकवणीच्या वाटेवरून चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असे विचार गोपुरी आश्रमाच्या संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी राजेंद्र कदम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमाला गोपुरी आश्रमाचे संचालक अर्पिता मुंबरकर, व्यवस्थापक सदाशिव राणे, उमेश जाधव, राजेंद्र कदम, अर्चना तेंडुलकर, मीना मोरे, कल्पेश मुळये, हर्षिता मोरे, काशीबाई परब, त्रिशा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!